
Project Asmi
An Initiative by Dr. Kalpana Vyawahare Foundation
देखणे ते सोहळे जे भावनांचे आरसे !
दिवसभर सूर्यमहाराजांनी भरपूर ताप दिल्यानंतर संध्याकाळी अवचित एखादी पावसाची सर येते आणि तापलेली माती त्या सरीला प्रतिसाद म्हणून सुगंधाचे लोट हवेत उधळते,त्याचा प्रत्यय देणारी आजची संध्याकाळ.
घडणाऱ्या वयात असलेल्या मुलांची मनं,त्यांची भावनिक वाढ हा समाजाच्या उपेक्षेचा,दुर्लक्षाचा विषय.त्या विषयाची धग वैशालीच्या संवेदनशील मनाला जाणवते,त्यावर उपाय म्हणून वैशाली ‘प्रोजेक्ट अस्मि’च्या रूपाने पावसाची सर बनून शाळा शाळांमध्ये जाते.. ‘अस्मि’च्या ताया आणि दादा विविध कल्पक उपक्रम घेऊन त्या मुलांच्या भावविश्वाला हळुवारपणे स्पर्श करतात..आणि मग त्यांनाही अनपेक्षित असे प्रतिसादाचे सुगंधी लोट दरवळतात आणि ही पाऊस बनून गेलेली मंडळी स्वतःच घमघमू लागतात..असा सगळा अजब अनुभव!
पाच वर्षांपूर्वी ही कल्पना वैशालीने तिच्या मैत्रीणींसमोर मांडली,खूप ब्रेनस्टॉर्मिंग,सेशन्सची रचना, मग केवळ सोशल मीडियावर केलेल्या आवाहनातून मिळालेल्या अडीचशे जणांचं शास्त्रशुध्द ट्रेनिंग आणि मग कामाला आरंभ.एकेक उपक्रम सुरु झाले आणि सहज म्हणून आलेली मंडळी त्या कामातून मिळणाऱ्या आनंदाने गुंतत गेली.काय करायचं? सोप्पंय.लहान लहान मुलांशी गप्प्पा मारायच्या, गाणी-गोष्टी-खेळ यांच्या माध्यमातून त्यांच्या मनात शिरायचं.बस..
संस्कार,उपदेश,मुलांची मने घडवणे वगैरे बाता मारायच्या नाहीतच मुळी!
ज्यांनी ही ‘सोप्पी’ कामं केलीत त्यांचे अनुभव ऐकताना समजत होतं की हे किती अवघड काम आहे!लहान मुलांशी मैत्री करणं सोपं नाही.तिथे कुठलाच व्यावहारिक शहाणपणा उपयोगाला येत नाही.आपलं शिक्षण,अनुभव,खूप सारे पूर्वग्रह,वय यातलं काहीच या पाच सात वर्षांच्या मुलांशी नाळ जोडण्यासाठी कामाला येत नाही.अस्मि चे संवादक हा अभिनिवेश बाजूला ठेवू शकले आणि म्हणूनच ते या निरागस जगात मिसळून गेले.जसे जसे ते मुलांच्या जवळ गेले तसतशा त्यांच्याही मनावरची एकेक पुटं निघत गेली असणार.त्यामुळेच ‘देव पहावया गेलो देवचि होऊन ठेलो’ असे म्हणणाऱ्या तुकोबांची धन्यता आज त्यांच्या बोलण्यातून ओसंडून वहात होती.
अस्मि च्या संवाद चॅनल आणि वेबसाईटचं उद्घाटन हे निमित्त.खरं महत्वाचं होतं ते या निमित्ताने झालेलं भावनांनी भिजलेल्या विचारांचं लाँचिंग!नुसते तार्किक विचार कितीही योग्य असले तरी फोफसे ठरतात.
वैशालीनं भावनांच्या तुपात भिजवून त्याच्या छानशा वाती केल्या.तिच्या संवादक मित्र मैत्रीणीनी त्या एकेका मुलामुलीच्या मनात निगुतीने लावल्या आणि त्यातून जे तेज निर्माण झालं त्याने आज भल्याभल्यांचे मेंदू उजळले!
आई आजीच्या वयात असणाऱ्या ‘ताया’ एकेक अनुभव सांगत होत्या..
वर्गात अस्वच्छता असायची..एकदा वर्गात कचऱ्याच्या ढिगाची गोष्ट आणि स्वच्छतेचं गाणं घेतलं. दुसऱ्या दिवसापासून वर्गात थक्क व्हावं अशी स्वच्छता! ‘इतकं सोपं असतं मुलांना बदलणं’?असं वाटावं, इतका सहज घडलेला बदल!
‘द्वेष’ असं विचित्र नाव मिळालेला, त्यामुळे थट्टेचा विषय झालेला मुलगा, ताईंनी अनवधानाने ‘रुद्र’ नाव दिल्यावर कसा खुलत गेला..
वडील गमावलेली आणि त्या धक्क्यामुळे वारंवार शू ला जावं लागणारी,कपडे ओले करणारी पहिलीतली शापित राजकन्या..तिचे समजूतदार शिक्षक..ताईनी सहज घेतलेला ‘छोटं हसू-मोठं हसू,छोटं रडू-मोठं रडू’ हा खेळ..तो संपताना ‘ताई,अजून दोनदा हसू-रडूया’? असं म्हणणारी ती राजकन्या आणि मग त्या लटक्या रडण्यातून वाहून गेलेला तिचा ताण!
‘ताई खा ना’ म्हटल्यावर ‘नाही गं उपास आहे’ असं म्हटल्यावर आपल्या डब्याच्या झाकणाचा सॉस पुसून त्या झाकणात शाळेत बनलेली मुगाची ‘खिचडी’ उपासाकरता आणणारी छोटी अन्नपूर्णा आणि ती खाऊन तिथेच उपास सोडणाऱ्या, तिच्या समाधानातच देव पाहणाऱ्या ताई..
हे छोटे दोस्त त्यांच्या मोठ्या ताईला तिची आई गमावल्याच्या दुःखातून बाहेर काढतात, त्यांच्या बाबांच्या वयापेक्षा मोठ्ठ्या असलेल्या ‘दादा’ला ‘हॅप्पी फ्रेन्डशिप डे’ विश करतात..अस्मि च्या संवादकांची मुलं-शिक्षक वाट पाहतात,सुटी लागली की टीचर येणार नाहीत म्हणून ‘थँक्यू’ चं इंस्टंट कार्ड बनवून देतात,कागदांचे चिठोरे करून स्वतःचं नावच न लिहिता नुसतंच ‘आईचा नंबर, बाबांचा नंबर’ असं म्हणून ढीगभर फोन नंबर हातात कोंबतात,हा अनमोल दस्तावेज त्या शिक्षिकाही निगुतीनं जपतात!
‘खरं सांगू का, या वयात आपली कुणीतरी वाट पहातंय हा विचारच उमेद देतो..’
एकेक अनुभव सांगताना त्या साऱ्या ‘अस्मिताया’ इतक्या भावुक होऊन गेल्या..
मी लिहिलेली प्रार्थना मला अपुरी वाटायला लागली.एकेक देव आपल्याला काय देतो, शिकवतो हे त्या प्रार्थनेत आहे.वाटलं भावनांचा देव कोणता?संवेदनेचा?निरागसतेचा?कोवळेपणाचा?हे सारे देव तर माझ्या समोर अनुभव होऊन उभे आहेत!मुलं आपल्याला शिकवतात.त्यांच्या अंतःकरणात खरा देव.त्या देवाचं रूप पाहण्याची ही संधी अस्मि ने ज्यांना दिली त्यांची कृतार्थता पाहण्याजोगी होती.
काम वाढलं, बोलावणी वाढत गेली तसं अस्मि ने तरुण मुलांना इंटर्न म्हणून घ्यायला सुरुवात केली.आणि ‘एकावर एक फ्री’ सारखे परिणाम दिसायला लागले.तरुण मुलांशी छोटे पटकन जोडले जाऊ लागले,आणि या निरागस प्रेमामुळे तरुण मुलांचा पेशन्स वाढला,त्यांच्या जाणिवा जाग्या झाल्या.आपल्या घरात आपल्या भावंडांच्या मनातही हाच ओलावा, हीच ओढ आहे हे त्यांना जाणवलं. ‘nothing matters’ ही बेफिकिरी ‘everything matters’ या जाणिवेत बदलली आणि त्यांच्याही घराघरातलं वातावरण बदलायला लागलं.
अस्मिच्या या ‘भीज पावसा’मुळे असं कुठं कुठं काय काय उमलतंय !
केलेलं काम मोजणं,त्या करता तंत्रज्ञान वापरणं याचं महत्व आहेच, त्याची अस्मि ला जाणीव ही आहे. पण या टप्प्यापर्यंत ते न करण्यामागचा त्यांचा विचारही भावला.केलेलं काम सतत मोजा-दाखवा-पोचवा-
विका या अट्टाहासाला बळी न पडता सातत्याने पाच वर्षे एक संपूर्ण भावनिक स्तरावरचं काम उभं करणं हे खूप कठीण आहे.तो संयम हे अस्मिचं खरं बलस्थान आहे.
आज उपस्थित असलेल्या दोन विद्वान अतिथींची प्रशस्तीपत्रे आणि या निमित्ताने समोर आलेले विचार अस्मि इतकेच सर्व समाजाकरता मोलाचे आहेत.किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्य विषयातल्या अधिकारी व्यक्ती, स.प. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा कुलकर्णी म्हणाल्या, ‘ज्या स्तरात मानसिक-भावनिक गुणांक म्हणजे काय याची गंधवार्ताही नाही अशा गटात अस्मि काम करते,हे फार महत्वाचं आहे.कोविडकाळात व त्यानंतर मुलांच्या भावविश्वात झालेली पडझड अद्याप भरून आलेली नाही.त्यामुळे मन सक्षम करण्याचं अस्मिचं काम फार महत्वाचं आहे.सर्व स्तरात असलेल्या मागणीला कौन्सिलर पुरे पडणार नाही आहेत त्यामुळे हे मॉडेल सर्वत्र वापरलं जायला हवंय’.
MKCLचे विवेकजी सावंत यांच्या बोलण्याने तर बहार आणली! ‘फार विचार न करता वैशालीने आपल्या मनाची हाक ऐकून उडी घेतली आणि मग त्याला ज्ञान आणि विचाराची जोड दिली त्यामुळेच हे उभं राहू शकलं..बाजूची परिस्थिती पाहताना मनावर आलेलं मळभ हा उपक्रम पाहून गेलं..who I am हा माणसाला सतावणारा प्रश्न, त्याचं उत्तर शोधायला आपण एकांतात जातो..अस्मि चं काम पाहून मला वाटलं की याचं उत्तर लोकांतात शोधायला हवं आणि त्या साठी whos I am हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.मी कुणाचा ? याला -मी या मुलांचा हे उत्तर यांना मिळालं आणि त्यातूनच आपल्या जगण्याचं प्रयोजनही यांना सापडलं ..अस्मि हा ‘प्रोजेक्ट’ असू शकत नाही, कारण या प्रकल्पाला संपण्याची तारीख नाहीये.ही एक चळवळ आहे..’
‘चळवळीत उत्स्फूर्तता असते आणि संघटनेत सातत्य’ हे सरांचं वाक्य ऐकताना वाटलं की वैशालीने तरुण वयात केलेलं विद्यार्थी परिषदेचं काम हे कदाचित याचं मूळ असेल..कारण याच ठिकाणी आम्ही शिकलो की उत्स्फूर्तता आणि सातत्य,शिस्त हे हातात हात घालून चालू शकतात,नव्हे तसे चालले तरच यश येतं!
‘विरजणपटू’लाही उत्साह वाटावा असं इथलं वातावरण आहे ..असा भन्नाट शेरा मारणारे सर त्यानंतर एक फार महत्वाचं सत्य सांगून गेले.
‘मध्यमवर्गीय जोवर वंचितांच्या जवळ जात नाही तोवर भारताचे भविष्य बदलणार नाही.बाहेरच्या परिस्थितीला अस्मि ने दिलेला हा प्रतिसाद फार सुंदर आहे.अस्मि ने निर्माण केलेलं हे प्रभावाचे वर्तुळ प्रेरणादायी आहे.मुलांचा भावनिक मेंदू नीट विकसित झाला नाही तर त्याचा ताबा प्राणिक मेंदू (serpent ब्रेन) घेतो आणि ती जनावरासारखी वागतात याउलट जर भावनिक मेंदू विकसित झाला तर तो वैचारिक मेंदूला कार्यरत करतो,हा फार महत्वाचा सिद्धांत अस्मि प्रत्यक्षात आणते आहे'
मुलं ही कळीसारखी..ती कशाने उमलतात, हे सांगताना त्यांनी टागोरांचा सुंदर दाखला दिला.टागोर म्हणत की कळी उमलावी म्हणून पाकळ्या ओढू गेलं तर त्या तुटतात.पण सूर्य येतो, त्याच्या किरणांच्या मुलायम स्पर्शाने पाकळी पाकळी आनंदाने उमलते..
हे ऐकताना वाटलं, या प्रयोगातून गेलेल्या मुलांना, त्यांचे पालक, शिक्षक, त्यांच्या भोवतीच्या कुणालाच, कदाचित कधीच याचं महत्व कळणार नाही..
नाहीतरी मोकळ्या आकाशानं,पहिल्या पावसानं,
पक्षांच्या गाण्यानं आपल्याला काय दिलं हे आपल्याला कधी कुठे कळतं ?
वैशाली आणि ‘अस्मि’च्या तायांनो, तुमचे खूप खूप आभार.या कामाबद्दल आणि एक सुंदर अनुभव आमच्या ओटीत घातल्याबद्दल..
खूप खूप शुभेच्छा!
-विनीता तेलंग